By, Avishkar Fule
पुणे, प्रतिनिधी: आंबेगाव परिसरात चोरीच्या दुचाकींचा वापर करून जबरी चोरी व चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन आरोपींना आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या तीन दुचाकी आणि १० ग्रॅम सोन्यासह एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता दत्तनगर येथील फिर्यादी आपल्या घराकडे पायी जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९(४) व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान आंबेगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सुमारे २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवली. आरोपी सासवड परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे व तपास पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रोहित राजू माने (वय २०), रा. खंडोबानगर झोपडपट्टी, सासवड आणि ओमकार विकास नाईक (वय २२), रा. संभाजीनगर, वडकी, पुणे अशी आहेत. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून तीन चोरीच्या दुचाकी, १० ग्रॅम सोने असा एकूण २.४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे करत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे यांच्या सूचनेनुसार आंबेगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली.









