कारच्या डॅशबोर्डमधून १ लाख ३५ हजारांची रोकड चोरी


By, Avishkar Fule

लोणी काळभोर, ता. १३ : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारच्या डॅशबोर्डमधून अज्ञात चोरट्याने १ लाख ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी (१२ जून) दुपारी घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत श्रीकांत राजेंद्र सुंबे (वय ४०, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंबे हे ‘सिद्धी ट्रान्सपोर्ट’ या नावाने पेट्रोल टँकर व्यवसाय करतात. त्यांनी कदमवाकवस्ती येथील युनियन बँकेच्या शाखेतून दीड लाख रुपये काढले होते. ही रक्कम त्यांनी त्यांच्या हुंडाई क्रेटा (एमएच १२ डब्ल्यूके ५३९०) या कारच्या डॅशबोर्डमधील कप्प्यात ठेवली होती.

कवडीपाट येथील ‘परफेक्ट कॅलिब्रेशन’ केंद्रात १५ हजार रुपये देण्यासाठी ते आपल्या भावासह तेथे गेले. दुपारी सुमारे १.१० वाजता कार पार्क करून दोघेही कार्यालयात गेले. काही वेळाने परत आल्यानंतर डॅशबोर्डमधील उर्वरित १ लाख ३५ हजार रुपये गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यानंतर त्यांनी तातडीने ‘११२’ हेल्पलाइनवर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरीस गेलेल्या रकमेत ५०० रुपयांच्या २७० नोटांचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

लोणी काळभोर पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेत आहेत.


29
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!