झाडावरून थेट झडप! ठेकेदाराच्या धाडसी सापळ्यात वीजतारा चोर रंगेहात जेरबंद अवसरी खुर्दमध्ये महिनाभरापासून सुरू असलेल्या वीजतारा चोरीला आळा; तीन साथीदार फरार


By, सुनिल घनवट

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव), प्रतिनिधी : वीजवाहक तारा चोरी करून परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना त्रास देणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी महावितरणच्या ठेकेदाराने चित्रपटालाही लाजवेल असा सापळा रचत एका चोरट्याला रंगेहात पकडले. झाडावर दबा धरून बसलेल्या ठेकेदाराने योग्य क्षण साधत चोरट्यावर झडप घातली आणि त्याला मंचर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही थरारक घटना शनिवारी (ता. १३) पहाटे अवसरी खुर्द येथील खेडकरमळा परिसरात घडली.

महावितरणचे ठेकेदार मयूर खेडकर यांच्या निवासस्थानासमोर वीजवाहक तारांचा मोठा साठा आहे. गेल्या महिनाभरापासून येथून वारंवार तारा चोरी होत असल्याने त्यांनी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. फुटेजमध्ये चार जण चोरी करत असल्याचे आढळून आले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी चोरी केलेल्या तारा शेतातील टॉवरजवळ लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. त्या तारा घेण्यासाठी चोरटे पुन्हा येतील, असा अंदाज बांधून मयूर खेडकर आणि त्यांच्या मित्रांनी शुक्रवारी रात्री सापळा रचला. शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास चार चोरटे घटनास्थळी दाखल होताच झाडावर दबा धरून बसलेल्या खेडकर यांनी एका चोरट्यावर झडप घालून त्याला पकडले. मात्र, त्याचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

घटनेची माहिती ग्रामपंचायत सदस्या उर्मिला तांबे यांनी मंचर पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याचे नाव गोपनीय ठेवले आहे. संबंधित आरोपी सराईत चोर असून त्याच्यावर विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

या टोळीने आतापर्यंत सुमारे दोन टन वीजवाहक तारा चोरी करून तब्बल आठ लाख रुपयांचे नुकसान केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून मंचर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

★ प्रतिक्रिया

“गेल्या अनेक दिवसांपासून वीजतारा चोरीमुळे शेतकरी आणि नागरिक त्रस्त होते. मयूर खेडकर यांनी दाखविलेले धाडस कौतुकास्पद आहे. पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवून कृषी पंप व केबल चोरीच्या घटनांना आळा घालावा.”

— प्रसाद कराळे, सरपंच तथा प्रशासक, अवसरी खुर्द ग्रामपंचायत.


29
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!