By, भारत गायकवाड
अकोला, प्रतिनिधी : शहरातील रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तारफैल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी (ता. १३) मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या वैमनस्यातून एका युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
मृत युवकाची ओळख अंकित धम्मपाल नंदागवळी (वय २९, रा. अशोकनगर, अकोट फैल, अकोला) अशी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकितचा काही व्यक्तींशी जुना वाद होता. त्याच वादातून दोन ते तीन आरोपींनी त्याला गाठून धारदार चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेला अंकित रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, रामदासपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिरीष खंडारे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास
हत्येनंतर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी रामदासपेठ पोलिसांच्या डिटेक्शन शाखेसह स्थानिक गुन्हे शाखेची पथके सक्रिय झाली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेण्यात येत आहे. प्राथमिक तपासात हत्येमागे जुने वैमनस्य कारणीभूत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आरोपींना लवकरच अटक : लेव्हरकर
“या घटनेत दोन ते तीन आरोपींचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह रामदासपेठ पोलिसांचे पथक सक्रिय झाले असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.”
– नितीन लेव्हरकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला
या घटनेमुळे तारफैल आणि अकोट फैल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.









