चाकणमध्ये बोगस FDA अधिकाऱ्यांचे पथक सक्रिय; विक्रेत्यांकडून हजारोंची खंडणी उकळण्याचा प्रकार


By, सुनिल घनवट

चाकण, ता. १४ : चाकण आणि परिसरातील औद्योगिक वसाहतीमध्ये स्वतःला अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून काही भामट्यांकडून व्यापारी, हातगाडीधारक तसेच वडापाव, सामोसे विक्रेत्यांना धमकावून पैशांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बनावट पथकाकडून पाच हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंत रकमेची मागणी केली जात असल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन ते तीन जणांचे हे पथक विविध दुकाने व खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे जाऊन स्वतःची ओळख FDA अधिकारी म्हणून करून देते. त्यानंतर खाद्यपदार्थांची तपासणी करण्याच्या नावाखाली परवाने व इतर कागदपत्रांची मागणी केली जाते. तपासणीदरम्यान मालामध्ये त्रुटी आढळल्याचा दावा करून संबंधित व्यापाऱ्यांना कारवाईची भीती दाखवली जाते.

“पाच-दहा हजार रुपये द्या, अन्यथा माल जप्त करून गुन्हा दाखल करू,” अशी धमकी देत पैसे उकळले जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. या प्रकारामुळे अनेक व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली असून काहींनी खबरदारी म्हणून दुकाने बंद ठेवली असल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान, चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. “अधिकृत तपासणीसाठी येणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी नेहमी वैध ओळखपत्र, आदेशपत्र आणि आवश्यक कागदपत्रे बाळगतात. त्यामुळे कोणतीही व्यक्ती अधिकारी असल्याचा दावा करत असल्यास तिची ओळख निश्चित करूनच सहकार्य करावे. अशा बोगस प्रकरणाची चौकशी केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.

या प्रकारामुळे चाकण परिसरातील व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.


29
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!