By, महेश जवळकर
नागपूर, ता. ८ (प्रतिनिधी) : अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) पावडरसह दोन कुख्यात गुंडांना अटक केली आहे. या कारवाईत ५२ ग्रॅम एमडी, २ लाख २९ हजार रुपयांची रोख रक्कम, तीन मोबाईल फोन आणि एक मोपेड असा एकूण ९ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये विजय नंदलाल रहांगडाले (वय ४३, रा. संघर्षनगर) आणि त्याचा साथीदार शहबाज शहा यांचा समावेश आहे. विजय रहांगडाले हा खून, दरोडा, लुटपाट, घरफोडी आणि अमली पदार्थ तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेला कुख्यात गुंड असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी वाठोडा रिंगरोड परिसरातील संघर्षनगर भागात पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाणे यांच्या नेतृत्वाखालील अमली पदार्थविरोधी पथक गस्त घालत होते. यावेळी दोघे जण एका मोपेडजवळ संशयास्पद हालचाली करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना हटकताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने तत्काळ पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले.
त्यांच्या अंगझडतीदरम्यान ५२ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर आढळून आली. पुढील तपासात विजय रहांगडाले याने एका फरार आरोपीकडून एमडी खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. तर शहबाज शहा हा एमडी घेण्यासाठी त्याच्याकडे आल्याची माहितीही समोर आली आहे.
या प्रकरणी भांडेवाडी पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून एमडी पुरवठा साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
रहांगडालेवर १७ गंभीर गुन्हे
अटक करण्यात आलेला विजय रहांगडाले हा शहरातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. त्याच्याविरुद्ध खून, दरोडा, जबरी चोरी, लुटपाट, घरफोडी तसेच अमली पदार्थांच्या तस्करीसह एकूण १७ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यापूर्वीही तो अनेकदा पोलिसांच्या रडारवर आला होता. आता त्याला एमडी पुरवणाऱ्या फरार आरोपीचा शोध घेण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.









