चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर दगडाने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, फरार पती अहिल्यानगरमधून अटकेत


By, Avishkar Fule

लोणी काळभोर : चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याच्या घटनेत जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शितल शरद वारे (वय ३४, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी (ता. ८) सकाळी ससून रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी पती शरद विठ्ठल वारे (वय ३७) याला लोणी काळभोर पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जूनच्या रात्री शरद वारे हा मद्यधुंद अवस्थेत पत्नी शितल यांच्याशी वाद घालत होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तो वारंवार शिवीगाळ करीत होता. पहाटे हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने शितल यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे.

शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आरोपीने शितल यांच्या मोबाईलवरून नातेवाईक गोरख वारे यांना फोन करून, ‘‘आमचे भांडण झाले असून मी शितलच्या डोक्यात दगड मारला आहे,’’ अशी माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असता परिसरात रक्ताचे डाग आढळून आले. शितल यांना प्रथम विश्वराज रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ससून रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गंभीर दुखापतीमुळे सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हल्ल्यानंतर आरोपी शरद वारे फरार झाला होता. लोणी काळभोर पोलिसांनी विशेष पथके तयार करून तांत्रिक माहिती, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा शोध घेतला. अखेर त्याला अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी गोरख संजय वारे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, महिलेच्या मृत्यूनंतर आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!