केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणाचा गैरफायदा; डॉक्टरांना अटकेची भीती दाखवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न


By, सुरज जगताप

केडगाव, ता. ९ : केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणाच्या तपासामुळे चिंतेत असलेल्या डॉक्टरांना लक्ष्य करून काही भामटे अटकेची भीती दाखवत पैशांची मागणी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.

गर्भलिंग निदान प्रकरणाच्या तपासासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ एमपल्ले यांनी दौंड तालुक्यात पाच भरारी पथके नियुक्त केली होती. या पथकांनी विविध रुग्णालयांची तपासणी केली असून काही ठिकाणी त्रुटी आढळून आल्या आहेत. तपासानंतर दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याने डॉक्टरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याच परिस्थितीचा फायदा घेत काही भामटे डॉक्टरांशी संपर्क साधत असल्याची चर्चा आहे. संबंधित व्यक्ती स्वतःला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळचे असल्याचे सांगून, “तुमचे नाव अटकेच्या यादीत आहे”, “एसआयटी तपासासाठी येणार आहे”, “सीडीआरमध्ये तुमचे नाव आले आहे” अशा प्रकारची भीती निर्माण करत आहेत. अटकेच्या यादीतून नाव काढण्यासाठी पैशांची मागणी केल्याचेही बोलले जात आहे.

काही डॉक्टरांनी या मागण्यांना नकार दिल्यानंतर संबंधित भामटे अलीकडेच अटक झालेल्या डॉक्टरांचे उदाहरण देत आणखी दबाव टाकत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी अशा भामट्यांचा शोध घ्यावा आणि डॉक्टरांची फसवणूक रोखण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अधिकृत यंत्रणांकडून अशा फोन कॉल्स किंवा पैशांच्या मागण्यांबाबत सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!