By, Avishkar Fule
पुणे, दि. 9 जून – वारसनोंद करून देण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी चोली बुद्रुक (ता. हवेली) येथील तलाठी आणि एका खासगी इसमाला अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) पुणे पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी (दि. 8 जून) दुपारी चोली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालयात करण्यात आली.
या प्रकरणातील आरोपींमध्ये सुनील भिकाजी सातोसे (वय 44), ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), चोली बुद्रुक आणि नेमाजी माधवराव भोकरे (वय 40), खासगी इसम यांचा समावेश आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आजोबांच्या निधनानंतर चोली बुद्रुक येथील वडिलोपार्जित शेतजमिनीवर त्यांच्या वडिलांची व काकांची वारसनोंद 7/12 उताऱ्यावर करण्यासाठी डिसेंबर 2025 मध्ये अर्ज करण्यात आला होता. मात्र, अनेकदा पाठपुरावा करूनही संबंधित वारसनोंद करण्यात आली नव्हती.
दरम्यान, 29 मे 2026 रोजी तक्रारदार चौकशीसाठी महसूल कार्यालयात गेले असता तलाठी सुनील सातोसे यांनी वारसनोंदीच्या कामासाठी सुरुवातीला 1 लाख 80 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोडीअंती ही रक्कम 80 हजार रुपयांवर आणण्यात आली. याबाबत तक्रारदारांनी 1 जून रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.
एसीबीने 4 जून रोजी केलेल्या पडताळणीदरम्यान सातोसे यांनी 80 हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर 70 हजार रुपये देण्याचे ठरविले. तसेच ही रक्कम खासगी इसम नेमाजी भोकरे याच्याकडे देण्यास सांगितले होते.
त्यानुसार 8 जून रोजी सापळा रचण्यात आला. चोली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालयात भोकरे याने तक्रारदाराकडून 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताच, एसीबीच्या पथकाने दुपारी 3.12 वाजता सातोसे आणि भोकरे या दोघांनाही रंगेहात पकडले.
दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त निता मिसाळ करीत आहेत.









