आंदेकर टोळीतील रेकॉर्डवरील आरोपी लोखंडी कोयत्यासह जेरबंद


By, Avishkar Fule

पुणे, दि. ९ : पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ पथकाने आंदेकर टोळीतील सक्रिय आणि रेकॉर्डवरील आरोपीला लोखंडी कोयत्यासह ताब्यात घेतले आहे. ओम गणेश नगरकर (वय २४, रा. हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे तो एका जुन्या गुन्ह्यात तब्बल आठ महिन्यांपासून फरार होता.

पुणे शहरातील सराईत गुन्हेगार आणि टोळीतील सक्रिय सदस्यांवर कडी नजर ठेवण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट-१ चे पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे आणि पथक परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार निलेश साबळे व हेमंत पेरणे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, आंदेकर टोळीतील सक्रिय आरोपी ओम नगरकर हा सोलापूर बाजार पीएमपीएमएल बसस्टॉपसमोरील कालव्यालगतच्या परिसरात आला असून त्याच्याकडे घातक शस्त्र आहे.

माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि ओम नगरकर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता आणि ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२८/२०२६ अन्वये आर्म्स ॲक्ट कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान ओम नगरकर हा समर्थ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक २२३/२०२६ मधील आरोपी असून तो गेल्या आठ महिन्यांपासून फरार असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा पुढील तपास लष्कर पोलीस ठाणे करीत आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहपोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. युनिट-१ चे पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे तसेच विनोद शिंदे, निलेश साबळे, हेमंत पेरणे, सिद्धेश्वर वाघमारे, सुहास डोंगरे, संदेश काकडे, अमित जमदाडे, मयूर भोसले आणि अविनाश दळवी यांनी ही कारवाई पार पाडली.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!