By, महेश जवळकर
कऱ्हाड, ता. ९ : जलसंपदा विभागातील अभियंता लक्ष्मण मंडले यांच्या मृत्यूमागील धक्कादायक कटाचा पोलिसांनी उलगडा केला असून, पत्नीच्या सांगण्यावरून प्रियकर आणि त्याच्या साथीदाराने बनावट अपघात घडवून त्यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आणखी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेली मोटारही जप्त करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रथमेश प्रकाश थोरात (वय २५, रा. कार्वे, ता. कऱ्हाड) आणि आकाश अशोक होनसुरे (वय २३, रा. कल्पतरू कॉलनी, कऱ्हाड) यांचा समावेश आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता १२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, लक्ष्मण मंडले आणि त्यांची पत्नी सारिका मंडले यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. पतीकडून त्रास होत असल्याच्या रागातून सारिका मंडले हिने पतीच्या हत्येचा कट रचला. तिचे प्रथमेश थोरात याच्यासोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्याने त्यांचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
घटनेच्या दिवशी रात्री लक्ष्मण मंडले यांनी पत्नीला आपण कऱ्हाडकडे येत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पहाटेपासून सारिका मंडले यांनी वारंवार पतीचे लोकेशन घेतले. हे लोकेशन तिने प्रियकर प्रथमेश थोरात याला पाठवले. पहाटे सुमारे ५.२० वाजता मंडले कोल्हापूर नाका परिसरात उतरून पायी घरी जात असल्याची माहिती मिळताच थोरात आणि आकाश होनसुरे यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला.
शिंदे हॉस्पिटलसमोर लक्ष्मण मंडले पायी चालत असताना संशयितांनी मोटारीने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत मंडले यांचा मृत्यू झाला. अपघाताचा आभास निर्माण करण्यासाठी आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जाताना त्यांनी मंडले यांची बॅग आणि मोबाईलही सोबत नेल्याचे तपासात उघड झाले.
यापूर्वी या प्रकरणात मृताच्या पत्नी सारिका मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतूनच खुनासाठी प्रथमेश थोरात आणि आकाश होनसुरे यांना सुपारी दिल्याची माहिती समोर आली. पैशाच्या आमिषाला बळी पडून आकाश होनसुरे याने मोटार चालवत मंडले यांच्या अंगावर वाहन घातल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दराडे करीत आहेत.









