पुण्यात प्रतिबंधित ई-सिगारेट व हुक्का फ्लेवर विक्री करणाऱ्यावर कारवाई; १.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त


By, तुषार लव्हे

पुणे, दि. ९ जून : विमानतळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विमाननगर परिसरातील ‘स्मोक हेवन’ या दुकानावर छापा टाकून प्रतिबंधित ई-सिगारेट व हुक्का फ्लेवरची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. या कारवाईत १ लाख ५७ हजार रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील स्मोक हेवन शॉपमध्ये प्रतिबंधित ई-सिगारेट व हुक्का फ्लेवरची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार लालु कहे यांना मिळाली होती. त्यानुसार विमानतळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला.

या कारवाईदरम्यान दुकानात मोहम्मद फाईज फारुख शेख (वय २२), रा. स्पर्श व्हिला, बालेवाडी, पुणे हा आढळून आला. पंचांसमक्ष दुकानाची झडती घेतली असता तेथून विविध प्रकारचे प्रतिबंधित हुक्का फ्लेवर, ई-सिगारेट आणि संबंधित साहित्य असा एकूण १ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी मोहम्मद फाईज फारुख शेख व दुकान मालकाविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९३/२०२६ दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ क्षिरसागर करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ७) प्रशांत अमृतकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (खराडी विभाग) नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव व पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश बोलके यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तसेच पोलीस अंमलदार लालु कहे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, दिगंबर गोरे, राजीव टोंम्पे, प्रशांत सुतार, आशा धादवड आणि सना शेख यांनी सहभाग घेतला.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!