By, सुनिल घनवट
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दारूबंदी पथकाने निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात छापा टाकून रासायनिक भेसळयुक्त व विषारी ताडी निर्मितीचा पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे ४०० लिटर विषारी ताडी, ताडी निर्मितीसाठी वापरण्यात येणारे क्लोरल हायड्रेट (Chloral Hydrate) हे रासायनिक पदार्थ तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार शहरात अवैध दारू, भेसळयुक्त मद्य व ताडी निर्मितीविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
गोपनीय माहितीच्या आधारे दारूबंदी पथकाला ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे क्लोरल हायड्रेटचा वापर करून कृत्रिम व विषारी ताडी तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त छापा टाकला. कारवाईदरम्यान ४०० लिटर रासायनिक भेसळयुक्त ताडी आणि ताडी निर्मितीसाठी वापरले जाणारे रासायनिक पदार्थ जप्त करण्यात आले.
पोलीसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे मौनेश यंकप्पा गुत्तेदार (वय २४, रा. पोरंडवाल चौक, देहूगाव, मूळ रा. रायचूर, कर्नाटक) आणि लक्ष्मण गुंडप्पा हुलसुरे (वय २६, रा. आंबेडकर नगर, देहूगाव, मूळ रा. निलंगा, जि. लातूर) अशी आहेत.
पोलीसांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेली ताडी मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून तिच्या सेवनामुळे गंभीर शारीरिक दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या भेसळयुक्त मद्यविक्रीविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये करीत आहेत.
दरम्यान, नागरिकांनी अवैध दारू निर्मिती किंवा विक्रीबाबत माहिती मिळाल्यास ती तात्काळ पोलिसांना 7798100112 या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले आहे.









