By, Avishkar Fule
पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-४ पथकाने मोक्का कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील तब्बल एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. कुणाल उर्फ सोन्या संजय चांदणे (वय २३, रा. भिमज्योत मित्र मंडळाजवळ, येरवडा, पुणे, सध्या रा. ग्रीन अॅव्हेन्यू, गोंधळेनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. ४३६/२०२६ मधील मोक्का गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे युनिट-४ करीत होते. तपासादरम्यान पोलीस अंमलदार अमजद खान शेख व तुषार खराडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी कुणाल चांदणे हा हडपसर येथील गोंधळेनगर परिसरात नवीन पत्त्यावर वास्तव्यास आहे.
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोंधळेनगर, कॅनॉलजवळील ग्रीन अॅव्हेन्यू, फ्लॅट क्रमांक १०६ येथे छापा टाकला. तेथे आरोपी कुणाल चांदणे आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने संबंधित मोक्का गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम तसेच हरीष मोरे, एकनाथ जोशी, अमजद खान शेख, तुषार खराडे, सुभाष आव्हाड, किशोर दुशिंग, नितीन साबळे, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचिम, अजय गायकवाड, वैभव रणपिसे, विशाल इथापे, शरद झांजरे, रोहिणी पांढरकर आणि मयुरी नलावडे यांनी ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.









