तळेगाव एमआयडीसीत फायर एक्सटिंग्विशरमधून वायूगळती; दोघांचा मृत्यू, दोघे रुग्णालयात


By, सुरज जगताप

तळेगाव स्टेशन, दि. ९ जून : पुणे जिल्ह्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत फायर एक्सटिंग्विशरच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामादरम्यान कार्बन डायऑक्साईड (CO₂) वायूची गळती होऊन दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघांना श्वसनाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील उषा फायर सेफ्टी इक्विपमेंट्स कंपनीमार्फत तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक १ मधील नवलाख उंबरे हद्दीतील शाफलर इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये अग्निशामक सिलेंडरच्या वार्षिक देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी उषा फायर सेफ्टी कंपनीचे तीन आणि शाफलर कंपनीचे दोन कर्मचारी काम करत होते.

काम सुरू असताना अचानक एका फायर एक्सटिंग्विशर सिलेंडरची सेफ्टी पिन निसटल्याने उच्च दाबाने कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडला. वायूच्या संपर्कात आल्याने काही कामगारांचा श्वास गुदमरून ते बेशुद्ध पडले.

जखमींना तत्काळ सोमाटणे येथील पवना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी वैभव भाऊसाहेब थोरात (वय २४, रा. गणेश सोसायटी, ताम्हाणे वस्ती, रुपीनगर, चिखली, पुणे) आणि गौरीशंकर शर्मा (वय ३८, रा. आंबी, ता. मावळ, पुणे) यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

दरम्यान, प्रमोद जैस्वार आणि नरसिहा पाटील यांच्यावर श्वसनाच्या त्रासामुळे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील करीत आहेत.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!