गाईला वाचवताना शेतकऱ्याचा मृत्यू; विजेच्या धक्क्याने दुर्दैवी घटना


By, Avishkar Fule

वेल्हे, ता. ९ (प्रतिनिधी) : राजगड तालुक्यातील अठरागाव मावळ परिसरातील कुसारपेठवाडी येथे गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात ५५ वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. ९) घडली. या दुर्घटनेत गाईचाही मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विठ्ठल भागू ढेबे (वय ५५, रा. कुसारपेठ) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल ढेबे हे आपली जनावरे चरण्यासाठी डोंगर परिसरात घेऊन गेले होते. यावेळी विजेच्या खांबावरील उच्चदाब वाहिनीची तार अचानक तुटून एका गाईच्या अंगावर पडली. गाईला वाचवण्यासाठी ढेबे पुढे सरसावले असता त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत गाय आणि शेतकरी दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. राजगडचे तहसीलदार निवास ढाणे यांनी याबाबत माहिती दिली.

नसरापूर महावितरण विभागाचे उपअभियंता सिद्धार्थ सोनसळे यांनी सांगितले की, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता ११ केव्ही उच्चदाब वाहिनीवरील पिन इन्सुलेटर निकामी झाल्यामुळे तार तुटून जमिनीवर पडल्याचे निदर्शनास आले. तुटलेल्या तारांच्या संपर्कात गाय आणि शेतकरी आल्याने ही दुर्घटना घडली. याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, वेल्हे पंचायत समिती सदस्य सीता नंदकुमार खुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!