रक्ताच्या नात्याला काळिमा; मुलीच्या ताब्यावरून झालेल्या वादात पित्याकडून मुलाचा खून


By, Tushar lavhe

निमगाव, ता. माळशिरस : जमीन विक्री आणि मुलीच्या ताब्यावरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाचा शेवट दुर्दैवी घटनेत झाला. निमगाव येथे जन्मदात्या पित्यानेच मुलावर लाकडी काठीने प्राणघातक हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वेळापूर पोलिसांनी अंकुश राऊत (वय ६१) याला अटक केली आहे.

मृताचे नाव नितीन अंकुश राऊत (वय ४०) असे असून, त्याची आई विमल राऊत यांनी पतीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नितीन याला दारूचे व्यसन होते. कौटुंबिक मतभेदांमुळे तो गेल्या १० ते १२ वर्षांपासून तासगाव येथे वास्तव्यास होता. त्याची दहावीत शिक्षण घेणारी मुलगी मात्र आजोबा अंकुश राऊत यांच्याकडे राहत होती.

मुलीच्या ताब्याचा मुद्दा आणि जमीन विक्रीच्या कारणावरून नितीन व त्याच्या वडिलांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जाते. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. संतापाच्या भरात अंकुश राऊत यांनी घरातील लाकडी काठीने नितीनच्या डोक्यावर आणि तोंडावर वार केले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नितीनला तातडीने वेळापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेनंतर वेळापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी अंकुश राऊत याला ताब्यात घेतले. त्याला माळशिरस येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेचा पुढील तपास वेळापूर पोलिसांकडून सुरू आहे.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!