By, Avishkar Fule
लोणी काळभोर, ता. ११ : महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी मंगळवारी लोणी काळभोर येथे भेट देत शेतकरी, कृषी केंद्र चालक आणि वितरकांच्या अडचणी जाणून घेतल्या. मान्सूनपूर्व हंगामाच्या पार्श्वभूमीवर खत, बी-बियाणे आणि कृषी निविष्ठांच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा अचानक दाखल झाल्याने परिसरात मोठ्या कारवाईच्या अफवा पसरल्या आणि व्यापारी वर्गात काही काळ खळबळ उडाली.
कृषी आयुक्तांनी लोणी काळभोर येथील जनसेवा कृषी विकास केंद्राला भेट देऊन विक्रेते दिनकर शिंदे तसेच उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खतांचा पुरवठा, बी-बियाण्यांची उपलब्धता, शेतकऱ्यांच्या समस्या आणि कृषी निविष्ठांच्या वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला. माती परीक्षणाला प्राधान्य देत सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

यावेळी ‘सीड्सचे साथी’ पोर्टल आणि मोबाईल अॅप याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कृषी निविष्ठांची ऑनलाइन विक्री, व्यवहारांची नोंद आणि शेतकऱ्यांना पारदर्शक सेवा देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.
दौऱ्यादरम्यान कृषी आयुक्तांनी बनावट बी-बियाणे, खते आणि कृषी औषधांच्या विक्रीबाबत कठोर भूमिका व्यक्त केली. निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे नमूद करत त्यांनी शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन केले. तसेच बोगस साहित्याची विक्री आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करत दोषींवर कठोर कारवाईचा इशाराही दिला.
दरम्यान, सकाळी अधिकाऱ्यांचा ताफा लोणी काळभोरमध्ये दाखल होताच कृषी भांडारांवर मोठी तपासणी सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या. काहींनी अन्न व औषध प्रशासनाची कारवाई असल्याचा अंदाज व्यक्त केला, तर काहींनी हा ताफा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असल्याची चर्चा सुरू केली. या अफवांमुळे अनेक व्यापारी आणि कृषी केंद्र चालकांनी एकमेकांशी संपर्क साधून माहिती घेण्यास सुरुवात केली. काहींनी तर संभाव्य कारवाईच्या भीतीने दुकाने बंद करण्याची तयारीही केली.
मात्र, काही वेळातच हा दौरा पूर्वनियोजित असून शेतकऱ्यांच्या समस्या आणि खतांच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठीच कृषी आयुक्त आले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर व्यापारी आणि कृषी केंद्र चालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. अफवांच्या वादळानंतर अखेर परिसरातील वातावरण पूर्ववत झाले.









