By, Avishkar Fule
पुणे, ता. ११ : पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-६ पथकाने दिवे घाट परिसरात धाडसी कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून २ गावठी पिस्तुले, ११ जिवंत काडतुसे आणि २ मोबाईल फोन असा एकूण २ लाख १ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
युनिट-६चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड हे मांजरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार समीर पांडुळे आणि गणेश माने यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम गावठी पिस्तुलांसह दिवे घाट परिसरात फिरत आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून विठ्ठलाच्या मूर्तीपासून सुमारे २० मीटर अंतरावर दोन संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे यश महेश मोडक (वय २३, रा. माणिकनगर, वाघजाई वस्ती, मांजरी खुर्द) आणि गौरव आण्णा नेटके (वय २२, रा. सटवाई नगर, मांजरी बुद्रुक) अशी सांगितली. त्यांच्या अंगझडतीत २ गावठी पिस्तुले, ११ जिवंत काडतुसे आणि २ मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी दोघांविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४६/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(२)(३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे, तानाजी देशमुख, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, प्रमोद टिळेकर, समीर पांडुळे, झाकीर पठाण, सतीश वणवे, शेखर काटे, गणेश माने, उमेश शेलार, अनिल जामगे तसेच महिला पोलीस अंमलदार पल्लवी मोरे, अश्विनी गायकवाड आणि लोखंडे यांनी सहभाग घेतला.









