सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त


By, तुषार लव्हे

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ आणि युनिट-२ यांनी संयुक्त कारवाई करत सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

पुणे शहरातील सुर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर, सोमनाथ गायकवाड आणि सुरज ठोंबरे टोळीतील सक्रिय व निष्क्रिय सदस्यांवर विशेष नजर ठेवण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार खंडणी विरोधी पथक-१ आणि गुन्हे शाखेच्या युनिट-२ कडून विशेष मोहीम राबविण्यात येत होती.

दरम्यान, दिनांक १० जून २०२६ रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अमोल आवाड यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम नांदेड सिटी येथील चुल आंगण हॉटेल परिसरात कंबरेला देशी बनावटीचे पिस्तूल लावून फिरत आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे आणि पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने आपले नाव आकाश उर्फ स्काय मंगेश सासवडे (वय २७, रा. पंतप्रधान आवास योजना सोसायटी, विंग क्र. ए-७, नांदेड सिटी, पुणे) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला खोचून ठेवलेले एक सिल्व्हर रंगाचे पिस्तूल आणि त्याच्या मॅगझीनमध्ये दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पिस्तूल बाळगण्याचा परवाना नसल्याचे त्याने कबूल केले.

पोलिसांनी शस्त्र जप्त करून आरोपीविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत हे पिस्तूल त्याने एका मित्राकडून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी आकाश उर्फ स्काय सासवडे याच्यावर पुणे शहरातील समर्थ, बंडगार्डन आणि फरासखाना पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्याविरुद्ध मोक्का, तडीपार आणि चॅप्टर केसचीही कारवाई झालेली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत खंडणी विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, युनिट-२ च्या पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, धिरज राऊत तसेच पोलीस अंमलदार फडतरे, अमोल आवाड, दांगडे, कांबळे, इम्रान शेख, जगताप आणि यादव यांनी सहभाग घेतला.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!