By, Avishkar Fule
पुणे, दि. ११ जून – चाकूचा धाक दाखवून मारहाण करत रोख रक्कम, दागिने, मोबाईल आणि ऑनलाईन व्यवहारातून पैसे लुटणाऱ्या दोन आरोपींना पर्वती पोलिसांनी अटक करून सुमारे ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पर्वती पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी हे ६ जून रोजी वेताळ बाबा मंदिर, गोरक्षनाथ मठ येथे आरतीसाठी आले असता जय भवानीनगर, गल्ली क्रमांक ८, पर्वती पायथा येथील सार्वजनिक शौचालयाजवळ चार जणांनी त्यांना अडवले.
आरोपींनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवत “तू येथे गांजा विकायला आला आहेस, असे पोलिसांना सांगू” अशी धमकी देऊन ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांना मारहाण करून पर्वती टेकडीवर नेण्यात आले. तेथे फिर्यादीकडील ३ हजार रुपये रोख रक्कम, सोन्याची कानातील बाली, गुगल पेद्वारे २१ हजार रुपये आणि ओप्पो रेनो कंपनीचा मोबाईल असा एकूण ४१ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अंमलदार अमोल दबडे आणि अमित चिव्हे यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी कात्रज बसस्टॉपच्या मागील बाजूस संतोषी माता मंदिरासमोर थांबले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून प्रमोद अंकुश कळंबे (वय २०, रा. पर्वती दर्शन, पुणे) आणि बसवराज ऊर्फ अभिषेक राजेंद्र पाटील (वय २०, रा. जनता वसाहत, पुणे, सध्या रा. खोपडे नगर, कात्रज) यांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) मिलिंद मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या सूचनेनुसार तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक किरण पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, अमोल दबडे, अमित चिव्हे, राकेश सुर्वे, स्वप्निल घुगे, नानासो खाडे, मनोज बनसोड, सद्दाम शेख आणि सुर्या जाधव यांनी ही यशस्वी कारवाई केली.









