पैशाच्या वादातून दुहेरी खून; पाच जणांना अटक, मुख्य सूत्रधार फरार


नागपूर, ता. ११ : सक्करदरा परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात गुन्हेशाखेच्या युनिट पाचच्या पथकाला यश आले असून या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मृतक आदित्य गजानन भोंडवे (२५, रा. सोमवारी क्वॉर्टर) याच्याशी असलेल्या पैशाच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार ऋषी पुट्टेवार अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वैभव ऊर्फ दादू प्रदीपराव डोंगरे (३०, नरसाळा), वेदांत ऊर्फ डब्बा अजय डबीर (२०, रघुजीनगर), अभिषेक ऊर्फ तात्या उत्तम राऊत (२६, न्यू नंदनवन), साहिल चौधरी आणि निरंजन दळवी यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य भोंडवे हा ऋषी पुट्टेवार यांच्या सक्करदरा बाजारातील फळांच्या दुकानात काम करत होता. काही कारणांमुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर तो वारंवार थकीत पैशांची मागणी करण्यासाठी दुकानात येत होता. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता.

मंगळवारीही आदित्य आपल्या मित्रांसह दुकानात जाऊन शिवीगाळ केल्याची माहिती ऋषी पुट्टेवार याला मिळाली होती. त्यानंतर आदित्य पुन्हा आल्यास त्याला धडा शिकवण्याच्या सूचना दुकानातील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास आदित्य भोंडवे हा त्याचा मित्र आदित्य मनोज राऊलकर (२४, मानेवाडा रोड) याच्यासह दुकानात आला. यावेळी पैशांच्या मागणीवरून आणि कामावर ठेवलेल्या व्यक्तीबाबत विचारणा करताना वाद वाढला. त्यानंतर आरोपींनी दोघांवर दगडाने हल्ला करून त्यांचा निर्घृण खून केला. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी दुकानातील कर्मचारी साहिल चौधरी याची चौकशी केली. त्याच्या मोबाइलमधील संपर्कांच्या आधारे पोलिसांनी लोकेश राचलवार व त्यानंतर रोखपाल निरंजन दळवी यांच्यापर्यंत धागेदोरे मिळविले. त्यांच्या माध्यमातून मुख्य आरोपींचा माग काढण्यात आला आणि गुन्हेशाखेच्या पथकाने सापळा रचून संबंधितांना अटक केली.

खुनानंतर कपडे नाल्यात फेकले

खुनानंतर आरोपींच्या अंगावरील कपडे रक्ताने माखल्याने त्यांनी ते गारगोटी नाल्यात फेकून दिल्याचे तपासात उघड झाले आहे. हे कपडे साहिल चौधरी याने आरोपींसाठी आणून दिल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!