By, सुरज जगताप
शिक्रापूर, ता. ११ : वरुडे (ता. शिरूर) येथे दीड वर्षांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून एका अल्पवयीनाने ४३ वर्षीय व्यक्तीचा धारदार कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या ३६ तासांत छडा लावत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. ७) पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब तांबे (वय ४३, रा. वरुडे) यांच्यावर त्यांच्या घराच्या पटांगणात झोपेत असताना धारदार कोयत्याने हल्ला करण्यात आला. आरोपीने घराच्या कड्या बाहेरून लावून तांबे यांच्यावर थेट मानेवर वार केला. सलग वारांमुळे तांबे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
तपासादरम्यान सुमारे दोन वर्षांपूर्वी मृत तांबे आणि आरोपी अल्पवयीन यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पुन्हा किरकोळ वाद झाल्याने आरोपीने सूड उगवण्याचा निर्णय घेतल्याचे निष्पन्न झाले. खून केल्यानंतर आरोपी स्वतःच्या घरी जाऊन झोपल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. दोन स्वतंत्र पथके तयार करून आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला. कुटुंबीयांकडे चौकशी केल्यानंतर संशयित अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिक्रापूर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सोमनाथ कचरे तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याचा अवघ्या ३६ तासांत छडा लावला.









