मोबाईल फोन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला कोंढवा पोलिसांकडून अटक; ११ मोबाईल जप्त


By, Avishkar Fule

पुणे : कोंढवा परिसरात मोबाईल फोन चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली असून त्याच्याकडून सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे ११ चोरीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता साळुंखे विहार रोडवरील सही अपार्टमेंटसमोरील ‘गौरीज तवा तडका’ हॉटेलमधून फिर्यादीचा मोबाईल फोन चोरीला गेला होता. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोंढवा तपास पथकातील पोलीस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण व अमोल हिरवे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, निळा शर्ट व जीन्स परिधान केलेला एक इसम शिवनेरीनगर येथील पारसी मैदानाजवळ चोरीचे मोबाईल विक्रीसाठी ग्राहक शोधत आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून उमर सलीम शेख (वय २१, रा. फ्लॅट नं. १०२, शिवनेरी टॉवर, गल्ली नं. २३, शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडील प्लास्टिक पिशवीतून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला रेडमी नोट १४ एसई मोबाईल फोन तसेच अन्य चोरीचे मोबाईल फोन आढळून आले.

तपासादरम्यान आरोपीने कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अन्य मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील मोबाईल फोनही चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडून आतापर्यंत एकूण ११ मोबाईल फोन जप्त केले असून त्यांची अंदाजे किंमत १ लाख ५० हजार रुपये आहे.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-५) राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त (वानवडी विभाग) नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस अंमलदार रविंद्र चिप्पा, मेमाणे, अमोल हिरवे, सचिन कोकरे, पुष्पेंद्र चव्हाण, केशव हिरवे, प्रशांत खाडे, संतोष बनसुडे, सुरज शुक्ला, अमित सूर्यवंशी, रियाज पटेल, राहुल शेलार, रशिद शेख, ओंकार शेटे, रासगे आणि शाहिद रजपुत यांनी सहभाग घेतला.

मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता तपासली जात आहे.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!