By, Avishkar Fule
लोणी काळभोर, ता. ११ : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
युसुफ करीम शेख (वय ७०, रा. लक्ष्मीनगर, गांधी चौक, दौंड) असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्यांचा मुलगा वसीम युसुफ शेख (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय सुनील बनकर (वय २५, रा. बनकरवाडी, ता. इंदापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शेख हे लोणी काळभोर येथील महिंद्रा कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. ३ जून रोजी सकाळी ड्युटी संपल्यानंतर ते पायी घरी परतत असताना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भरधाव वेगातील दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेख यांच्यावर सुरुवातीला लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना दौंड येथील पिरॅमिड रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच ६ जून रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
अक्षय बनकर याने निष्काळजीपणे व वेगाने दुचाकी चालवून अपघात घडवून आणल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.









