पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्याला 70 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक


By, सुनिल घनवट

पिंपरी-चिंचवड, दि. 11 जून 2026 : अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) पुणे पथकाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ प्रभागातील अतिक्रमण विरोधी विभागाच्या कर्मचाऱ्याला 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये करण्यात आली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, उमेश अरुण लोंढे (वय 28), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (वर्ग-3), ड प्रभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका याने तक्रारदाराकडून 70 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने पिंपळे गुरव परिसरातील आपल्या तीन मजली बांधकामावर अतिक्रमण विभागाकडून कारवाई होऊ नये, यासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार 9 जून रोजी एसीबीकडे केली होती.

तक्रारदाराच्या बांधकामाबाबत महापालिकेने यापूर्वी अनधिकृत बांधकामाची नोटीस दिली होती. या प्रकरणी तक्रारदाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने नियमानुसार दंड भरून बांधकाम नियमित करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्याने कारवाई टाळण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

एसीबीने 11 जून रोजी तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. सायंकाळी सुमारे 5.35 वाजता उमेश लोंढे यांनी तक्रारदाराकडून 70 हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून वाकड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने सांगितले.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा कारवाईचे नेतृत्व सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश वाळके यांनी केले, तर पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करीत आहेत.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!