By, राहूल बुट्टे
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध हातभट्टी दारू विक्रीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा अवैध दारू विक्री केंद्रे जेसीबीच्या सहाय्याने पाडून कायमची नष्ट केली.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार, पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली.
अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या सराईत आरोपींविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान संबंधित दारू विक्रीची ठिकाणे अनधिकृतपणे उभारण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर एमआयडीसी प्रशासनाशी पत्रव्यवहार करून ही बांधकामे हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
11 जून रोजी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि एमआयडीसी प्रशासनाने संयुक्त कारवाई करत खालील आरोपींची अवैध दारू विक्री केंद्रे जमीनदोस्त केली :
* दुरेश रमेश राठोड – सिंग्मा चौक, महाळुंगे
* लखन जडजा शिंदे – सिंग्मा चौक, महाळुंगे
* पुष्पादेवी शांतीलाल जाट – हिंदुस्थान पेट्रोल पंप, तळवडे ब्रिज, निघोजे
* लखन हाजुरीया ठाकूर – डी.के. चौक, कुरुळी
* उदय अशोक कलाल – एचपी पेट्रोल पंपाजवळ, तळवडे रोड
* सुश्मिता बंडू हितेज – सुभाषवाडी, निघोजे
या कारवाईमुळे परिसरातील अवैध हातभट्टी दारू विक्री व्यवसायाला मोठा आळा बसणार असून भविष्यातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त डॉ. सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक दिवसे व त्यांचे पथक तसेच एमआयडीसी विभागाचे अधिकारी कर्डीले आणि त्यांच्या पथकाने सहभाग घेतला.









