By, Avishkar Fule
पुणे, प्रतिनिधी : एमबीबीएस शिक्षणासाठी नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत विद्यार्थी आणि पालकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात फिर्यादीकडून 8 लाख 12 हजार रुपये उकळून फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 165/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी आदित्यकुमार उर्फ अरविंद प्रकाश कुमार आरोगोंडा (वय 47, रा. सिकंदराबाद, तेलंगणा) याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीविरोधात हैदराबाद आणि मुंबई येथे अशाच प्रकारचे सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. आरोपी हा मुंबईतील पवई पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड कारागृहात होता. न्यायालयाच्या वॉरंटनुसार त्याला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले.
सोशल मीडियावर जाहिराती, बनावट करारनामे आणि खोटे प्रवेशपत्र
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी “EDUVIO Learning Solutions Pvt. Ltd.” या नावाने कंपनी स्थापन करून पुणे, मुंबईसह विविध शहरांत शाखा सुरू केल्या होत्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एमबीबीएस प्रवेशाची हमी देणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करून विद्यार्थी व पालकांना संपर्क साधण्यास प्रवृत्त केले जात होते.
सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी 5 लाख रुपये, तर खासगी कॉलेजसाठी 2 ते 3 लाख रुपये “काउन्सेलिंग फी” म्हणून घेतली जात होती. प्रवेश न झाल्यास रक्कम परत देण्याचे आश्वासन देत बनावट करारनामेही करण्यात येत होते.
विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी कंपनीने तयार केलेल्या “Rank Predictor” आणि “College Predictor” अॅप्लिकेशनचा वापर करून प्रवेशाची खात्री दिली जात होती. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना बनावट प्रवेशपत्रे आणि खोटी प्रमाणपत्रे देण्यात येत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
40 हून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक
आतापर्यंत कंपनीमार्फत सुमारे 40 विद्यार्थ्यांना प्रवेशाचे आमिष दाखवून पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश झाल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन काही दिवसांनी कॉलेजमध्ये हजर राहण्यास सांगितले जात होते. मात्र प्रमाणपत्रे बनावट असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही आणि त्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेले.
महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालकांची अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करत आहेत. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमूला रजनिकांत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय ठाकर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.









